स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
मुंबई प्रतिनिधी दिनांक 26. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी EVM ईव्हीएमविरोधातील भूमिका उचलून धरली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पराभूत आमदारांची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी EVM ईव्हीएमच्या आकडेवारी आणि प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला. त्यावर पक्षप्रमुखांनी गांभीर्याने विचार करून ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.
वकिलांची टीम मैदानात
शरद पवार यांनी पराभूत उमेदवारांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे राज्य आणि केंद्रीय पातळीवर दोन वेगळ्या वकिलांच्या टीम्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या टीम्स ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींचा अभ्यास करून पुरावे गोळा करतील आणि न्यायालयीन लढाई लढतील.
व्हीव्हीपॅट तपासणीवर भर
बैठकीत पवार यांनी सर्व पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट तपासणीसाठी तत्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले. 28 तारखेपर्यंत वेळ असल्याने, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातील व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी करून त्याबाबतचे पुरावे गोळा करण्याची सूचना देण्यात आली.
इंडिया आघाडीची एकत्रित लढाई
राज्यस्तरावरील लढाईसोबतच, इंडिया आघाडीही ईव्हीएमच्या मुद्द्यावर एकत्र येऊन देशव्यापी मोहीम राबवणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी पराभूत उमेदवारांना ऊर्जा देत, “आता मागे हटायचं नाही, लढायचं!” असा संदेश दिला.
पराभूत उमेदवारांचे गाऱ्हाणे आणि पवारांची ठाम भूमिका
बैठकीत आमदार जितेंद्र आव्हाड यांसारख्या विजयी उमेदवारांनीही ईव्हीएमबाबत आक्षेप नोंदवले. त्यामुळे ईव्हीएमविरोधातील आक्रमकतेला आता आणखी बळ मिळाले आहे. पवारांनी फक्त आरोपांवर न थांबता, तांत्रिक आणि कायदेशीर लढाईसाठी चोख तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएमविरोधातील लढाई आता तीव्र होईल, अशी चिन्हे दिसत असून, विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा निर्धार केला आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.