www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
उस्मानाबाद,दि. 26 जून2023 राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हास्तर, तालुकास्तर, गावपातळीवर सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने सकाळी 8.00 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते. या समता दिंडीचे उद्घाटन उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांचे शुभहस्ते झाले. समता दिंडीमध्ये वीस महाविद्यालयाचे, जवळपास दोन हजार विध्यार्थी प्रामुख्याने एन.सी.सी. एन.एस.एस., स्काऊट गाईड तसेच पारंपारिक वेशभूषेतील विध्यार्थी सहभागी झाले होते. समता दिंडी मल्टीपर्पज हायस्कूल, जिल्हा परिषद ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन समता दिंडीचा समारोप करण्यात आलेला आहे. तदनंतर सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, उस्मानाबाद या ठिकाणी बलभिम शिंदे,उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती उस्मानाबाद यांच्या अध्यक्षेखाली सामाजिक न्याय दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमास सुर्यकांत भुजबळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद, प्रमुख व्याख्याते म्हणून भैरवनाथ कानडे, डॉ.संदीप तांबारे, तसेच सामाजिक न्याय विभागातील विविध पुरस्कार प्राप्त् व्यक्ती, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा स्तरावर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये इ.10 व 12 वी मध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून प्रथम आलेल्या अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्याना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, तसेच निबंध/ वकृत्व् स्पर्धमध्ये प्रथम व्दितीय,तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमधील 6 विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लाभाचे धनादेश वितरण करण्यात आले.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब अरवत यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमासाठी युवराज भोसले, अतुल जगताप समाज कल्याण निरिक्षक,अमोल कांतगळे, बिभीषण सिरसट, कपिल थोरात, युवराज चव्हाण,राम गुरव.संकेत भोसले,सकेत जगताप, विकास राठोड, रमेश वाघमारे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.