परंडा येथे एक अनोखा विवाह सोहळा, नविवाहित दाम्पत्याकडून पाहुण्यांना पुस्तकांची भेट.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. आज सर्वांच्याच हातामध्ये मोबाईल फोन आला आहे त्यामुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. आणि हाच सामाजिक बदल घडविण्यासाठी मु.पो. रुई ता. परंडा येथील शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेल्या कापसे कुटुंबियांनी महापुरूषांचे विचार घराघरात रुजविण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वाढविण्यासाठी दिनांक ०१ जुन रोजी आपल्या मुलाच्या लग्नासाठी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला पुस्तक भेट देऊन समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला. अशा आदर्श व अनोख्या उपक्रमाचे परंडा पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
या अनोख्या विवाह सोहळ्यामध्ये सर्वप्रथम वधू वरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विवाहाची सुरुवात शिवमती आशाताई मोरजकर ,जिल्हा अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड धाराशिव यांनी जिजाऊ वंदना करून केली.
शिवश्री माधव रामभाऊ कापसे रा. रुई ता परंडा यांचे सुपुत्र- चि. ऋषिकांत व शिवश्री येडबा गोविंदराव येडे(पाटील) रा अंजनवती ता.जि. बीड यांची शिवकन्या चि. सौ.कां. दिपाली या नवदाम्पत्याच्या हस्ते लग्नात आलेल्या मान्यवरांना,पाहुणे मंडळींना आणि संपूर्ण महिलांना राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीमाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे,पुरूषोत्तम खेडेकर व इतर समाजसुधारक यांची पुस्तके भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
हा अनोखा उपक्रम राबविण्याची कल्पना जि प शाळा कात्राबाद शाळेचे आदर्श आणि उपक्रमशील शिक्षक व नवरदेवाचे मोठे बंधु शिवश्री रविंद्र कापसे सर यांची होती. प्रत्येक नागरिकांमध्ये समता, बंधुता रुजावी, धार्मिक तसेच जातीभेद नष्ट व्हावेत व वाचन संस्कृती वाढावी यासाठी प्रत्येकाने महापुरूषांचे विचार आत्मसाद करावे, ते घराघरात पोहचावेत, मोबाईलमुळे लोप पावत असलेली वाचन संस्कृती रुजावी या पार्श्वभूमीवर लग्नात आलेल्या पाहुण्यांना महापुरूषांचे जीवन चरित्र तसेच विविध विषयांवरील पुस्तके वाटप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रमाकांत कापसे सरांनी सांगितले.
त्याच प्रमाणे लग्नामध्ये अनावश्यक खर्च टाळून आलेल्या पाहुण्याकडून फक्त शैक्षणिक साहित्य आणि पुस्तक रूपी भेट आहेर म्हणून स्विकारली. लग्नाच्या सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पुस्तकांचा स्टॉल लावला होता. बऱ्याच पाहुणे मंडळींनी त्या स्टॉलवरून पुस्तक विकत घेऊन नवदाम्पत्यांना ते पुस्तक भेट म्हणून दिले. आहेरामधून जमा झालेली सर्व पुस्तके शाळेला भेट देण्यात येणार आहेत असे कापसे कुटुंबियाकडून सांगण्यात आले.
लग्नामध्ये हार,फेटा,पत्रिका, डीजे,फटाके अशाप्रकारचा अनावश्यक खर्च टाळून एक आगळा वेगळा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम आज कापसे परिवाराच्या वतीने घेण्यात आला त्याबद्दल सर्व स्तरातून कापसे परिवाराचे कौतुक होत आहे.
या विवाह सोहळ्यासाठी कापसे परिवाराचे स्नेही,नातेवाईक,मित्र परिवार व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी नवं वधूवरांना आशिर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या.

चौकट
*ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, विवाह सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिला- पुरुष यांच्या हाती कापसे कुटुंबाच्या माध्यमातून भेट दिलेली पुस्तक पाहून आनंद वाटला.*
मा.आमदार सुजितसिंह ठाकुर

चौकट
*आज एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहिल्यास समाधान मिळाले, दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक विवाह सोहळ्यास उपस्थित राहतच असतो या विवाह सोहळ्यामध्ये पुस्तकाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढवावी यासाठी आपसे कुटुंबांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.*
मा.आमदार राहुल भैय्या मोटे

चौकट
*आमचे पणजोबा कै. रामभाऊ गणपत कापसे यांनी अनेक वर्ष पूर्वी घरामध्ये ग्रंथालय सुरू केले होते, त्यामुळे आम्हा सर्व मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली, यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली .आज आमच्या 31 लोकांच्या कुटुंबामध्ये उच्च शिक्षण घेऊन अनेकांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या, हे सर्व वाचनामुळे शक्य झाले म्हणून प्रेरणादायी उपक्रम आम्ही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने घेतला.*
रमाकांत कापसे
नवरदेवाचे लहान बंधू

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!