www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
खरीप २०२० पिक विमा प्रती हेक्टरी रु. १८००० प्रमाणे २,०३,६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई वितरणासाठी उपलब्ध – आ.राणाजगजितसिंह पाटील
तेरणा एक्सप्रेस न्यूज रिपोर्ट (उस्मानाबाद-धाराशिव)
प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप २०२० प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध केलेली आहे व प्रति हेक्टरी रुपये १८००० नुकसान भरपाई देण्याचे देखील कबूल केले असल्याची माहिती आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.
मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा आदेश कायम राखत मा. सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला परंतु मा. सर्वोच्च न्यायालयाकडील रुपये २०१.३४ कोटीचा धनाकर्ष शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून सदरील रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी पुढील एक दोन दिवसात उपलब्ध होणार आहे.
दरम्यानच्या काळात विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच आपल्या मागणीप्रमाणे ४०% नुकसान गृहीत धरून रुपये १८००० प्रति हेक्टर प्रमाणे भरपाई देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. उद्या दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पुनश्च विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे, व पुढील याद्या बाबत चर्चा केली जाणार आहे. उपलब्ध २०१.३४ कोटी मधून या २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई अदा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
आपल्या याचिकाकर्त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केलेली आहे व याची रीतसर नोटीस विमा कंपनी व जिल्हाधिकारी यांना देण्यात येत आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.